सूरज कसबे, प्रतिनिधी
वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेडगे वस्ती परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका इलेक्ट्रिक दुचाकी सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गझेबो हॉटेलच्या मागे असलेल्या बजाज कंपनीच्या 'एथर' (Ather) इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटर असलेल्या पत्र्याच्या गोडाउनला पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
या भीषण आगीत गोडाऊनमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेल्या सुमारे ३५ ते ४० दुचाकी गाड्या आणि इतर मौल्यवान साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे सर्व्हिसिंग सेंटरचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, ही घटना पहाटे घडल्याने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झालेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याचा मारा करून आग त्वरित नियंत्रणात आणण्यात आली.
नक्की वाचा - Pune News: 20 मजूरांसह 12 लहान मुलांना ठेवलं नजर कैदेत, वीट भट्टी मालकाचं हे अघोरी कृत्य का केलं?
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीच्या कारणांचा आणि नुकसानीचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.