पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारी आणि सिंहगड महाविद्यातील विद्यार्थिनीला आज मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर पाक समर्थनात पोस्ट केली होती. दरम्यान या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोडसे यांनी महाविद्यालयाच्या वकिलांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
न्यायमूर्ती गोडसे यावेळी म्हणाले, तुम्ही विद्यार्थिनीचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. हे कोणत्या प्रकारचे वागणे आहे? कुणीतरी काहीतरी व्यक्त केलं की तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार? तुम्ही तिला महाविद्यालयातून निलंबित केलं? तिला तिचं स्पष्टीकरण मांडण्याची संधी दिली होती का? असा सवाल न्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, शैक्षणिक संस्थेचा उद्देश काय आहे? फक्त शैक्षणिक शिक्षण देणं? विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं की त्यांना गुन्हेगार बनवायचं? तुम्हाला काही तरी कारवाई करायची हे आम्हाला कळतं. पण त्यासाठी तिला परीक्षेला बसण्यापासून रोखू शकत नाही. उरलेले तीन पेपर तिला देता यायला हवे, असंही न्यायाधीशाने कोर्टात ठणकावून सांगितलं. या प्रकरणात विद्यार्थिनीविरुद्ध पोलिसांनी “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने यावरही नाराजी व्यक्त करत राज्य यंत्रणेवर तसेच महाविद्यालय प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली.
काय आहे प्रकरण?
भारत पाकिस्तान तणावादरम्यान पुण्यातील एका विद्यार्थिनीने सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट केली होती. या संबंधात करवाई करत कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली होती आणि त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारगृहात करण्यात आली होती. सबंधित विद्यार्थिनी ही इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात असून तिची चौथी सेमिस्टर सुरू झाल्याने तिचे वकील फरहाना शाह यांनी तातडीच्या सुनावणीसाठी अपील केली होती. विद्यार्थिनीने आपल्या याचिकेत म्हटले की, पाक समर्थनार्थ पोस्ट दोन तासात डिलिट करण्यात आली होती आणि ती फक्त एक रिपोस्ट होती, त्यात कुठलाही वेगळा हेतू नव्हता. या सगळ्या प्रकरणानंतर तिला महाविद्यालाने काढून टाकले होते.