प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है... मात्र हेच प्रेम जीवघेणंही असतं. आपल्या देशात हत्येचं तिसरं सर्वात मोठं कारण प्रेम आहे. देशात दर दहा पैकी १ हत्येचं कारण प्रेम किंवा अवैध संबंध आहेत.
जेव्हा बातम्या तपासल्या तेव्हा अशी अनेक प्रकरणं समोर आली, ज्यात कोणा मुलीने किंवा मुलाने त्याच्या पार्टनरची हत्या केली. उदाहरण पाहिलं तर एप्रिलमध्ये मुंबईच्या विरारमध्ये २७ वर्षीय एका तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नी आणि तिच्या आईची हत्या केली. आईने लग्नास नकार दिल्यामुळे त्याने दोघींची हत्या केली. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगडच्या बिलासपूरमधील २२ वर्षीय एका तरुणीने आपल्या २५ वर्षीय प्रियकराची चाकू खुपसून हत्या केली होती. प्रियकराने तिला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं हे त्यामागील कारण होतं.
आता या सर्वात पुण्यातून एक नवं प्रकरण समोर आलं आहे. येथे सिया गोयल नावाच्या २० वर्षीय मुलीने आपल्या होणाऱ्या पतीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. सियाने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतनची हत्या केली. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं.
यापूर्वी मार्च २०२५ मध्ये मेरठमधून सौरभ राजपूत याच्या हत्येचं प्रकरण समोर आलं होतं. सौरभची पत्नी मुस्कानने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर सौरभचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकून सिमेंटने बंद करण्यात आला.
जीवघेणं प्रेम...
यामध्ये केवळ होणारा नवरा किंवा पत्नीचा जीव जातो असं नाही. तर अनेक प्रकरणात आई-वडील आणि भावा-बहिणींचाही जीव घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २३ जून रोजी आलेल्या बातमीनुसार, बंगळुरूमध्ये एका मुलीने प्रियकरासोबत मिळून आपले आई-वडील आणि लहान बहिणीची हत्या केली.
आकड्यांनुसार, प्रेम हे हत्या करण्याचं सर्वात मोठं कारण आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार, देशभरात हत्येचं तिसरं सर्वात मोठं कारण प्रेम आणि अवैध संबंध असतात.
NCRB नुसार, २०२४ मध्ये देशभरात २७,०४९ हत्या झाल्या. यामधील २,८०२ हत्येमागील कारण लव्ह अफेअर्स किंवा अवैध संबंध होते. याचा अर्थ १० टक्के हत्या या दोन कारणांमुळे झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक १० पैकी १ हत्या. आकडेवारीनुसार, २०१० ते २०१४ दरम्यान एकूण खुनांच्या घटनांमध्ये अशा प्रकारच्या खुनांचे प्रमाण ७ ते ८ टक्के होते. २०१६ ते २०२४ दरम्यान, खुनांच्या संख्येत घट होऊनही, हे प्रमाण १० ते ११ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
२०२४ मध्ये, केवळ १९ महानगरांमध्ये प्रेमप्रकरणं आणि अनैतिक संबंधांमुळे १८७ खून झाले. याचा अर्थ असा की, देशभरात या दोन कारणांमुळे झालेल्या खुनांपैकी ६.६% खून केवळ १९ महानगरांमध्ये झाले.
प्रेम कधी जीवघेणं होतं?
केवळ भारतातच नाही तर जगभरात अशा अनेक खून आहेत, ज्याचं कारण प्रेम प्रकरण किंवा अवैध संबंध असतात. २०२१ मध्ये चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीचे प्राध्यापक वेन क्वी चेनने Analysis of the Psychological Factors of Love Murder Cases वर अभ्यास केला होता. यामध्ये त्यांनी काही कारणं सांगितली होती.
या अभ्यासात त्यांनी सांगितलं की, प्रेम प्रकरणात हत्येची चार कारणं असतात.
पहिलं - ब्रेकअप
दुसरं - दोन व्यक्तींच्या आयुष्यात तिसऱ्याची एन्ट्री
तिसरं - फसवणूक किंवा प्रतारणा
चौथं - नकार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world