
सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पुण्यातील गौरव आहुजा या बड्या बापाच्या पोराने भरचौकात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने सोसायटीतील 13 दुचाकी जाळल्याची संतापजनक घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका 27 वर्षीय तरुणाने सोसायटीमधील 13 दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी शहरातील पिंपळे निलख या उच्चभ्रू परिसरात असलेल्या मोरया क्षितीज बिल्डिंग या सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सोसायटीमधील दुचाकींना अज्ञाताने मध्यरात्री आग लावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत सीसीटीव्ही तपासले असता हे कृत्य सोसाटीमधील रहिवासी असलेल्या स्वप्नील शिवशरण पवारने केल्याचे दिसून आले. त्यानंतर सोसासटीमधील नागरिकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी मुलाच्या पालकांनीही पोलिसांकडे तक्रार केली आहे. आपला मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने असे कृत्य करतो तसेच पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्वप्नीलच्या आईने म्हटले आहे. त्याला सोडू नका अन्यथा तो आणखी असेच उद्योग करेल, अशी विनंतीही त्याच्या आईने पोलिसांकडे केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world