यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ४० हून अधिक विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात हा भीषण प्रकार घडला आहे. नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल ४० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तेलंगणातील एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
आरोपीला ऑर्थर रोड कारागृहातून घेतले ताब्यात
आदित्यकुमार उर्फ अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा असं आरोपीचं नाव आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीच हैदराबाद आणि मुंबई येथे फसवणुकीचे ६ गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील पवई पोलिसांनी त्याला आधीच एका गुन्ह्यात अटक केली होती. ज्यामुळे तो मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. धक्कादायक बाब म्हणजे कारागृहातून हा मुख्य आरोपी लोकांच्या लुटीचा प्लान करीत असल्याचा संशय आहे. पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी त्याला या कारागृहातून ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
पालकांची कोट्यवधींची फसवणूक
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या साथीदाराने मिळून हैदराबादमध्ये एडव्हिओ लर्निंग सोल्युशन्स प्रा. लि. नावाची एक बनावट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पुणे आणि मुंबईमध्ये प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू केली. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना टार्गेट करून त्यांनी आपल्या जाळ्यात ओढलं. पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी चक्क खोटे प्रवेशपत्र आणि बनावट कागदपत्रे तयार करून दिली.
सव्वाआठ लाखांच्या फसवणुकीनंतर गुन्हा दाखल
पुण्यातील एका पालकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर या रॅकेटचा भांडाफोड झाला आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास केला असता, केवळ एक कुटुंबच नव्हे, तर पुणे आणि परिसरातील ४० हून अधिक विद्यार्थी-पालकांना अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालं आहे. या मोठ्या शैक्षणिक फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस अत्यंत गांभीर्याने करत असून, यात आणखी काही साथीदार किंवा एजंट सामील आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.