अजिंक्य धायगुडे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका सात वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप करण्यात आला आहे. प्रियदर्शनी बागडे या सहा वर्षाच्या चिमुरडीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. येथे तिच्यावर तपासणी करण्यात आली. काही दिवसापूर्वी रुग्णालयाने मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. आता मुलीच्या डोळ्यातील तिरळेपणा दूर होईल अशा आशेने मुलीचे आई-वडील वाट पाहत होते. मात्र प्रत्यक्षात भयंकर घडलं.
डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडताच तब्येत बिघडली...
ठरल्याप्रमाणे काल १९ मे रोजी मुलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप सोडण्यात आले. मात्र यादरम्यान अचानक मुलीला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. पालकांना कल्पना न देता मुलीला तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अचानक तब्येत बिघडली म्हणून आम्ही तिला सीपीआर देत आहोत असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मात्र काहीच वेळात मुलीने जीव सोडला.
घडला प्रकार बाहेर येऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. मात्र ससून रुग्णालयाने पोलीस तक्रारी शिवाय आम्ही शवविच्छेदनासाठी मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर प्रकरण पोलिसांमध्ये गेले. मात्र पोलिसांनी या प्रकरणात नवा पवित्रा घेतला. शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय आम्हाला गुन्हे दाखल करता येणार नाहीत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world