अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune News: पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. आपल्या आजीकडे सुट्ट्यांसाठी आलेल्या एका 4 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आली होती. दुपारी घरासमोर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर एका गोठ्यामध्ये या चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
नराधमाचे पाप उघड कसं उघड झालं?
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये 65 वर्षांचा व्यक्ती चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाने चिमुकलीला गोठ्यात नेले, तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता या क्रूर आरोपीने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता.
(नक्की वाचा : Pune News: कॅब चालकाच्या सतर्कतेमुळे अमेरिकन नागरिकांचा डाव फसला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, प्रकरण काय? )
गावकरी आक्रमक आणि गोठ्यासमोरच ठिय्या
ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. संतप्त गावकऱ्यांनी गोठ्यासमोरच ठिय्या मांडला असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले आहे. जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आरोपीला आमच्या स्वाधीन केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असले तरी, लोकांचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये.
( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीमध्ये लाचखोरीची पन्नाशी पूर्ण! 40 हजारांसाठी लिपिकाने स्वाभिमान विकला )
पोलीस प्रशासनासमोर पेच
घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस प्रशासनाकडून आक्रमक झालेल्या गावकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे आणि हत्येमुळे गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण नसरापूर गावातून केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.