Pune News : आयटी नगरी हिंजवडी परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. हॉटेलचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या अजिंक्य विनोदे यांना त्यांच्या भाडेकरूंनी १९ ऑक्टोबर, रविवारी दुपारी 3.15 च्या सुमारास पिझ्झा कटर, काटे चमचा आणि सिमेंट ब्लॉकने जबर मारहाण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी जुना जकात नाका परिसरातील 'बेलबॉटम' हॉटेलमध्ये ही घटना घडली. 5 ते 6 जणांनी अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला केला. आरोपींमध्ये सुमीत सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान यांची नावे समोर आली आहेत. यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारची कारवाई देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 109, 189, 191 सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा - Buldhana News: शिंदेंच्या आमदाराचा 'कार'नामा! कमिशन म्हणून ठेकेदाराकडून घेतली 2 कोटींची डिफेंडर कार, सत्य काय?
अजिंक्य विनोदे हे चिंचवड येथील जयहिंद बँकेचे संचालक आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तर अजिंक्य यांचे वडील धनाजी विनोदे हे जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वाकड भागात अजिंक्य विनोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहतात. अजिंक्य विनोदे यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीही वैयक्तिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.