- अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी
Pune News: राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय कारंडेविरोधात पुण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइलमधील चॅट्स आणि पासवर्ड मागितल्याच्या कारणावरून कारंडेने पत्नीला बॅटने बेदम मारहाण केली इतकंच नव्हे तर तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
पुण्यात नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास कारंडेच्या क्वीन्स गार्डन येथील निवासस्थानी हा प्रकार घडला. आरोपी विजय कारंडे हा नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत होता पण सध्या मुंबईत मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. घटनेच्या दिवशी कारंडेच्या 30 वर्षीय पत्नीने त्यांच्या मोबाइलमधील काही चॅट्सबाबत संशय व्यक्त करत मोबाइलचा पासवर्ड मागितला. या क्षुल्लक कारणावरून कारंडेचा संयम सुटला आणि त्यानं रागाच्या भरात पत्नीवर हल्ला केला.
(नक्की वाचा : Purandar News: लग्नाच्या पंगतीत 'ते' काय वाढलं? जेवणानंतर 62 हून अधिक पाहुण्यांचा जीव धोक्यात, पुरंदर हादरलं)
Photo Credit: NDTV Marathi
मुलावरही बॅटने प्रहार
कारंडेनं पत्नीला बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी त्याचा लहान मुलगा मधे पडला असता, कारंडेनं मुलालाही बॅटने मारहाण करून जखमी केले. या भीषण हल्ल्यातून पीडित महिलेने स्वतःची सुटका करून घेतली आणि मुलासह घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलीस कारवाईपीडित महिलेने तातडीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय कारंडेविरोधात भारतीय न्याय संहिताच्या (BNS) कलम 109(1) (खून करण्याचा प्रयत्न), 118(1) (जाणीवपूर्वक दुखापत करणे) आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका मंत्र्याच्या ओएसडीवर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.