यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News Rishikesh Vaidya : नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याने महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले आहे. एका महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पसार झाला होता. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर न्यायालयात सादर केले. त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी आवळल्या मुसक्या...
पुण्यातील कथित अत्याचार प्रकरणात आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. तपासासाठी आरोपीचा मोबाईल, व्हिडीओ, फोटो आणि चॅटिंगची माहिती महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने स्वतःला “महादेवाचा अवतार” असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने इतर महिलांनाही फसवले आहे का, याचाही तपास करायचा असल्याने सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. आरोपीला पुणे आणि वसई येथे नेले असल्याची माहिती समोर आली असून तो इतर कुठल्या ठिकाणी गेला होता का, याचाही तपास केला जाणार आहे. तसेच काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत का, याचाही शोध घेण्यात येणार आहे.
दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलिसांच्या आरोपांना विरोध केला. फिर्यादी महिलेने स्वतः फेसबुकवरून संपर्क साधला होता, तसेच कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा दावा करण्यात आला. महिलेने स्वतःहून आरोपीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असेही वकिलांनी सांगितले. आरोपीची धार्मिक पार्श्वभूमी चांगली असून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तसेच लॉजवरील सीसीटीव्ही तपासण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
नेमके प्रकरण काय आहे ?
अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील विवाहित महिलेने हिंमत करुन हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिला ही मुळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदु ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली. वैद्य हा मुळचा वसई येथील राहणारा आहे. त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो, असे सांगितले. २०२३ मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची एका लॉजवर भेट घेतली. तिला त्याने गुंगीचे औषध देऊन, मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती असे बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईत बोलावलं आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वसई आणि पुणे पोलीस ऋषिकेश वैद्य याचा शोध घेत होते. तो पिंपरी परिसरात असल्याचं समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. भोंदू बाबा वैद्य यांनी आणखी काही महिलांची लैंगिक शोषण केले असल्याची शक्यता आहे त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world