Pune News : बास्केट बॉल खेळताना विशालचा मृत्यू; पुण्यातील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये भयंकर निष्काळजीपणा

पुण्यातील नामांकित तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : इंदुरी येथील नामांकित तोलानी मॅरिटाइम इन्स्टिट्यूटमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी बास्केटबॉल खेळत असताना मैदानातील लोखंडी स्टँड अंगावर कोसळल्याने विशाल वर्मा या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय....?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल वर्मा हा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत इन्स्टिट्यूटच्या मैदानावर बास्केटबॉल खेळत होता. खेळ रंगात आलेला असताना, अचानक बास्केटबॉलचे वजनदार लोखंडी स्टँड विशालच्या अंगावर कोसळले. हे स्टँड थेट त्याच्या डोक्यावर पडल्याने तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मैदानावरील इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्याला तळेगाव येथील मायमर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच विशालचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

नक्की वाचा - 'दारुड्याला घरी कशाला आणलं?'; पत्नीच्या वाक्याने चक्र फिरलं; मदतीला आलेले 3 विद्यार्थी बनले 'क्रूरकर्मा'

व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर संताप.....

या घटनेनंतर तोलानी इन्स्टिट्यूटच्या परिसरात तणावाचे आणि संतापाचे वातावरण आहे. इतक्या मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेत खेळाच्या साहित्याची वेळोवेळी देखभाल  केली जात नव्हती का ? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. लोखंडी स्टँड गंजलेले होते की त्याचे फिटिंग कमकुवत होते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पोलीस तपास सुरू......
 

घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान आम्ही या घटनेची नोंद केली असून मैदानावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहोत. या अपघाताला नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास तांत्रिक पथकाद्वारे केला जाईल," असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. एका हुशार विद्यार्थ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणावरून आता संस्थेच्या सुरक्षिततेच्या ऑडिटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.