Pune News : पुणे जिल्ह्यातील एका मंदिरात मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणाच्या कृत्यानंतर अनेक मुस्लीम कुटुंबांनी त्यांचं भाड्याचं घर सोडल्याचं समोर आलं आहे. यासोबतच, काही लोकांवर त्यांचे व्यवसाय बंद करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे. हा प्रकार पुण्यातील मुळशी तालुक्यातील काही (Many families left their homes in Pune ) गावांमध्ये घडला आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज नावाच्या संघटनेने यासंदर्भात आरोप लावला आहे.
यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आलं आहे. याबाबत ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, या प्रकरणात कोणतीही तक्रार असेल तर तातडीने पोलिसांशी संपर्क करा.
नक्की वाचा - Pune News: वारी मार्गावर अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 'ते' दोन आरोपी अखेर अटकेत
पीयूसीएलचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती जी.डी. पारेखसह इतर पदाधिकाऱ्यांनी याचिकेत म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून पौंड आणि पिरंगुट भागात अल्पसंख्यांक समुदायांची दुकानं आणि व्यावसायिकांना बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही ठिकाणांवर बॅनर लावण्यात आले असून हस्ताक्षर अभियान चालवलं जात आहे.
पोलिसांची भूमिका काय आहे?
मे महिन्यात पौंड परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांना याची माहिती मिळताच, तिथे लावलेले बॅनर काढून टाकण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. यानंतर स्थलांतरित झालेले अल्पसंख्याक व्यापारी आणि कामगार आता परत येत आहेत. ग्रामस्थ आणि पोलिसांची संयुक्त बैठकही यावेळी घेण्यात आली. जर कुणालाही काही अडचण असेल तर थेट पोलिसांशी संपर्क करा, अस एसपी संदीपसिंह गिल यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावातील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्ण देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचं सांगितलं जात होतं. या घटनेनंतर मुळशीतील ग्रामस्थांसह राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.