जाहिरात

Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ

Pune Crime News: पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ
Pune Crime News : टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून त्याने या मुलींना सातव्या मजल्यावर नेले.
पिंपरी चिंचवड:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या सुरक्षारक्षकावर सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्यानेच चार निष्पाप चिमुरड्यांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. एका 10 वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच आवर घालण्यात यश आले आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी दुपारी जेव्हा सोसायटीच्या परिसरात शांतता होती, तेव्हा या नराधम सुरक्षारक्षकाने आपले क्रूर मनसुबे रचले. आरोपी दिनेश चौधरी याने सोसायटीत खेळणाऱ्या 10, 8, 6 आणि 8 वर्षे वयोगटातील चार मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. 

टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून त्याने या मुलींना सातव्या मजल्यावर नेले. तिथे नेल्यानंतर त्याने या लहान मुलींशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

( नक्की वाचा : Shirdi News: 100 कोटींचा किराणा अन् 'असा' दर्जा? साई संस्थानच्या प्रसादालयातील 'त्या' पाहणीने खळबळ )

जीवे मारण्याची धमकी आणि...

आपले कृत्य कोणाला कळू नये यासाठी आरोपीने या लहान मुलींना प्रचंड घाबरवून सोडले होते. हा प्रकार जर कोणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन, अशी धमकी त्याने या चिमुरड्यांना दिली होती. 

आरोपीच्या या अक्राळविक्राळ रूपामुळे आणि धमकीमुळे मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, या परिस्थितीतही एका मुलीने दाखवलेली प्रसंगावधानता मोलाची ठरली.

( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )

धाडसी मुलीमुळे नराधम गजाआड

त्या चार मुलींपैकी एका 10 वर्षांच्या मुलीने आरोपीच्या धमकीला न घाबरता धैर्याने वागण्याचे ठरवले. घरी पोहोचताच तिने न डगमगता आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. मुलीने सांगितलेली आपबिती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी विलंब न लावता तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. 

पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ हालचाली केल्या आणि आरोपी सुरक्षारक्षक दिनेश चौधरी याला बेड्या ठोकल्या आहेत.

उच्चभ्रू सोसायट्यांमधील सुरक्षिततेचा प्रश्न

एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीत अशी घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ज्यांच्याकडे सुरक्षिततेची जबाबदारी दिली जाते, तेच जर असे कृत्य करणार असतील तर मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com