- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विषारी दारू प्रकरणानंतर अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई सुरू केली आहे
- एकाच दिवशी २३ कारवाया केल्या असून, ११ महिलांसह २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
- या कारवाया पिंपरी, भोसरी, आळंदी, तळेगाव, देहूरोड, चाकण, महाळुंगे, चिंचवड, रावेतमध्ये करण्यात आल्या
सूरज कसबे
विषारी दारू कांड प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीर दारू व्यवसायिकांवर कायद्याचा बडगा उगारला आहे. दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांकडे वळवला आहे. त्या माध्यमातून एकाच दिवसात तब्बल 23 कारवाया करण्यात आल्या आहेत. यात 11 महिलांचा ही समावेश आहे. त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी दापोडी येथे विषारी दारू पिऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
या धडक मोहिमेत पोलिसांनी किरकोळ दारू विक्री, निर्मिती आणि ताडी विक्री प्रकरणी 11 महिलांसह एकूण 29 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पिंपरी, एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, चाकण, महाळुंगे, चिंचवड, रावेत, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील भागांचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांनी सर्वत्र एकाच वेळी ही कारवाई केली. या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूविक्रीच्या 20 प्रकरणांमध्ये सुमारे 700 लिटर दारू जप्त केली आहे.
तसेच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी महात्मा फुले नगर येथील एका सलून दुकानाच्या आडोशाने सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रावर छापा टाकला. तिथून जवळपास 100 लिटर ताडी हस्तगत केली. याशिवाय दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या दोन अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले तब्बल 2200 लिटर रसायन नष्ट केले आहे. बेकायदेशीर दारूची विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कडक आणि नियमित मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड इथं झालेल्या या विषारी दारू कांडामध्ये 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही विषारी दारू पिऊन त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अशा दारु विक्रीला कोणता ही पायबंद नव्हता. मात्र अठरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस ही हादरले होते. त्यानंतर दारुकांडाला जबाबदार पकडून 9 पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. या कारवाईने पोलीस दल ही हादरलं. त्यानंतर आता असा अवैध धंद्यांवर पोलीसांकडून धडक कारवाई होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world