देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याशी कथित गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित सुरक्षा रक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
विद्यार्थ्याशी संवाद साधताना मोठा खुलासा...
मुख्याध्यापिका विमल खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने प्रवेश घेतलेला विद्यार्थी सुरुवातीच्या काही दिवस सतत रडत होता. २२ जून रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना संबंधित विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्राने सुरक्षा रक्षक आपली पप्पी घेतो आणि आपल्या कॉटला कॉट लावून झोपतो, अशी तक्रार केली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकांनी तत्काळ सुरक्षा रक्षकाच्या सुपरवायझरशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलावलं आणि अशा प्रकारचे वर्तन पुन्हा करू नये, अन्यथा नोकरीवरून काढून टाकले जाईल, अशी सक्त ताकीद दिली.
दरम्यान, २४ जून रोजी विद्यार्थी घरी गेला. त्यानंतर १३ जुलै रोजी पोलिसांकडून मुख्याध्यापिकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथे विद्यार्थ्याने सुरक्षा रक्षकाने आपल्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप केल्याचे प्रथमच समोर आले. या प्रकरणात विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली असून समाजकल्याण विभागाने संबंधित कंपनीला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर सुरक्षा रक्षकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. यापुढे मुख्याध्यापकांसोबत दररोज एक शिक्षक निवासी राहणार असून शाळेत दोन सुरक्षा रक्षक कायम तैनात राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी शाळेत जाऊन पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. विद्यार्थी, त्याचे पालक आणि इतर साक्षीदारांच्या उपस्थितीत तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.