- पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे भागात मांजरी घरात येतात या कारणावरून वाद आणि हाणामारी झाली होती
- कविता चिंतामणी सोनवणे या ६० वर्षांच्या महिलेंवर शेजारी सुर्यवंशी कुटुंबाने हल्ला केला
- हाणामारीत कविता यांच्या डोक्यावर वीट फेकण्यात आली असून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती
सूरज कसबे
वाद विवाद, हाणामारी या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्याला कोणत ही कारण लागत नाही. पण अशा काही हाणामारीच्या घटना असतात त्या मागची कारणं तर अतिशय शुल्लक असतात. ही कारणं पाहीली तर खरोखर अशा गोष्टीवरून हाणामारी होते असा प्रश्न पडतो. तशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. मांजरी घरात ये जा करतात या शुल्लक कारणावरून एका 60 वर्षाच्या वृद्ध महीलेवर हल्ला चढवण्यात आला. त्यात ती जखमी झाली आहे. शिवाय तिच्या डोक्यात वीट ही फेकून मारण्यात आली आहे.
ही घटना पिंपरी चिंचवडच्या ताथवडे या भागात घडली. मांजरी घरात येतात या किरकोळ कारणावरून हा वाद झाला. कविता चिंतामणी सोनवणे या 60 वर्षाच्या महिला इथं राहातात. त्यांच्या शेजारी सुर्यवंशी कुटुंब राहतं. या कुटुंबाकडे मांजरी आहेत. त्या सतत सोनवणे यांच्या घरात येतात. याबाबत कविता यांनी वारंवार तक्रार केली होती. पण त्यांना अटकाव करण्यात येत नव्हता. अशा स्थितीत सोनवणे आणि सुर्यवंशी या कुटुंबात जोरदार वाद झाला.
हा वाद इतका टोकाला पोहोचला की कविता चिंतामणी सोनवणे यांच्यावर सारंग सुर्यवंशी आणि दोन महीलांना हल्ला केला. कविता यांचे केस धरून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवाय सारंग याने सोनवणे यांच्या कपाळावर वीट फेकून मारली. त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे. त्यांनी या मारहाणीनंतर तात्काळ वाकड पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय पुढील तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world