यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण परमेश्वराचा अवतार असल्याचं सांगत एका भोंदूबाबाने २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. भोंदू बाबाने तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं.
ईश्वराचा अवतार असल्याचं भासवून भोंदूबाबाने एका २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीवर अनेक वर्षे लैंगिक अत्याचार केला. तरुणीला आपले मूत्र पिण्यास भाग पाडून विजेचे शॉक देत तिचा शारिरीक-मानसिक छळ केल्याचा घृणास्पद प्रकार या भोंदूबाबाने केल्याची माहिती आहे. भोंदू बाबाने तरुणीला नवऱ्यापासून विभक्त होण्यास भाग पाडले. तिची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतली. तरुणीच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला त्यांच्या नजरेत खोटं ठरवलं. या भोंदू बाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या तरुणीने धाडस केले करून पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
परमेश्वराचा अवतार असल्याचं सांगत अत्याचार...
राधामोहन मिश्रा (वय 59) असं या नराधम भोंदू बाबाचं नाव आहे. त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय 57) याच्यासह सहा महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 2001 ते 2026 दरम्यानच्या कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्चशिक्षीत असून पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे वडील डॉक्टर आहेत. हे सर्व मुळचे हरियाणा येथील राहणारे आहेत. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा तरुणीचे वडील गेले होते. याच कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबियांचा भोंदू राधामोहन मिश्रा याच्यासोबत परिचय झाला. त्यावेळी मिश्राचा आश्रम पंचकुला येथे होता. त्याचे नाव गुरूदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे तरुणीचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. महाराज दिव्यपुरूष असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. साक्षात परमेश्र्वराचा अवतार. ते सहज कोणाला भेटत नाहीत. त्यांना वाटले तरच ते दर्शन देतात. भोंदूबाबा विषयी खोटं सांगत भाविकांची दिशाभूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्त IAS तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
पुण्याच्या वाघोली जवळील उबाळेनगर परिसरात या मिश्रा बाबाच्या आश्रमात मोठं घबाड आढळून आलं आहे. मिश्राच्या भुयारी खोल्यात ८ लॅपटॉप, ११ मोबाईल, १९ हार्ड डिस्क, २९ कॅसेट, २३ पेन ड्राईव्ह, १० जिवंत काडतुसं असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेकडो मेडिकलसंबंधित गोळ्याही सापडल्या आहेत.