सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पिंपरी चिंचवड शहरातील दत्त मंदिर रोड परिसरात कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना वाकड पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. "आम्ही इथले भाई आहोत" अशी फुशारकी मारणाऱ्या या तरुणांची गुंडगिरी पोलिसांनी चांगल्याच प्रकारे उतरवली असून आता या आरोपींचा पोलिसांची आणि जनतेची माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास वाकडमधील दत्त मंदिर रोड परिसरात आरोपींनी हातात कोयते घेऊन धुडगूस घातला होता. यावेळी त्यांनी रस्त्यावरील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली. यात अर्जुन मल्हारी देवकांबळे, गजानन बापूराव पाचपिल्ले, गौरव सुनील जाधव यांचा समावेश असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
नक्की वाचा - Pune News : राज्यात पहिल्यांदा दिली अशी शिक्षा; पुण्यात उपद्रवी तरुणांची सुटका नाहीच!
अटकेनंतर पोलिसांनी या गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवून दिली. "आम्ही जे केलं ते चुकीचं होतं, कुणीही असं करू नये," असे म्हणत हे तरुण आता हात जोडून नागरिकांची माफी मागत आहेत. वाकड पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना जरब बसली आहे.