Pune News : पुण्याच्या गजबजलेल्या बुधवार पेठेतील अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून एक नाव अत्यंत दबदब्यानं घेतलं जात होतं, ते नाव म्हणजे बाबू भैय्या. हॉटेलमध्ये छोटी-मोठी कामं करणाऱ्या एका साध्या कामगाराचा या पेठेतील अनैतिक व्यापाराचा किंगपिन होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा तर आहेच, पण त्याहून भयानक आहे त्याने विणलेलं मानवी तस्करीचं जाळं. तब्बल दोन दशकांपासून पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून बांगलादेश ते पुणे अशी तस्करीची साखळी चालवणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित आता उघड झालं असून पुणे पोलिसांनी या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे.
कसा झाला मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश?
पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी अलीकडेच एक धाडसी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 22 महिलांना ताब्यात घेतले, ज्याची सखोल चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यातील 11 महिला या मूळच्या बांगलादेशी नागरिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी टाकलेल्या दोन छाप्यांमध्येही 10 बांगलादेशी नागरिक आढळले होते. या महिलांकडे भारतीय बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर ओळखपत्रे सापडली आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी मानव तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड बाबू भैय्या उर्फ पापा शेख असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )
हॉटेलमधील कामगार ते तस्करीचा मास्टरमाईंड
बाबू भैय्या उर्फ पापा शेख हा गेल्या 20 वर्षांपासून पुणे शहरात सक्रिय आहे. सुरुवातीच्या काळात तो एका हॉटेलमध्ये किरकोळ कामे करायचा, मात्र तिथूनच त्याने वेश्याव्यवसायातील बारकावे शिकून घेतले. कोलकात्यामार्गे बांगलादेशी महिलांना पुण्यात आणण्याचे तंत्र त्याने अवगत केले आणि हळूहळू आपले साम्राज्य विस्तारले.
पापा शेखने तीन लग्ने केली असून त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे. या तिन्ही पत्नी बुधवार पेठेत आपला दरारा राखून आहेत आणि पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतात. जर एखाद्या महिलेने या दलदलीतून बाहेर पडण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर तिला बेदम मारहाण केली जात असे, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
( नक्की वाचा : Pune News : आईचा मित्र बनला नराधम,13 वर्षांच्या मुलीला शाळेत नेतो म्हणून भर रस्त्यात कारमध्येच...पुण्यात संताप )
अमिष दाखवून महिलांची फसवणूक आणि छळ
हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. आरोपी महिलांना ब्युटी पार्लरमध्ये नोकरी किंवा शिलाई कामाचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणत असत. पुण्यात आणल्यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा धाक दडपशाही करून वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. या महिलांच्या कमाईतील मोठा हिस्सा हा पापा शेख आणि त्याची टोळी स्वतःकडे ठेवत असे.
या प्रकरणी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा आणि रूपा शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या मुख्य सूत्रधार पापा शेख फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
फरासखाना आणि खडक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 11 बांगलादेशी महिलांना पुन्हा त्यांच्या देशात म्हणजेच बांगलादेशात पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या रॅकेटमध्ये बांगलादेश सीमेवर बसून बोगस कागदपत्रे तयार करून देणारे दलाल कोण आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत बुधवार पेठेत अशा प्रकारच्या कारवाया वाढल्या असून, मानवी तस्करीचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तोडण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world