2 FIR, 2 ब्लड रिपोर्ट, अपघातावेळी कार कोणी चालवली? पुणे पोलीस आयुक्तांच्या पीसीमध्ये मोठे खुलासे

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील महत्त्वाचे खुलासे केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात अनेक दावे केले जात आहेत. दोन FIR का दाखल करण्यात आली, दोन ब्लड रिपोर्ट घेण्याचं कारण काय?, अपघातावेळी त्यांचा ड्रायव्हर पोर्शे कार चालवत होता का? आरोपीला सुरुवातील 304 अ कलम लावण्यात आलं होतं, त्यात बदल करून 304 का करण्यात आला?, ते रॅप साँग कुणाचं?, येरवडा तुरुंगात पिझ्झा पार्टी झाली होती का? अशा विविध विषयांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं.   

दोन वेळा रक्ताची तपासणी का?
19 मे रोजी रात्री अडीच वाजता अपघात झाल्यानंतर 20 मे, सोमवारी सकाळी 11 वाजता पहिला रक्ताचा नमुना घेण्यात आला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान दुसरा रक्ताचा नमुना घेण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत का, याबाबत काही दुमत राहू नये यासाठी याची तपासणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. अद्याप याबाबत फॉरेन्सिक लँबकडून अपडेट आलेली नाही.  

दोन वेळा एफआयआर दाखल केली का?
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एफआयआर दाखल केल्याचा दावा केला जात आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त म्हणाले की, पहिला एफआयआर पोलिसांकडून आणि दुसरी बाल न्याय हक्क अॅक्टनुसार करण्यात आली आहे. बाल न्याय हक्कातील कलमं लावून दुसरी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुरुवातील  एफआयआरमध्ये 304 अ कलम लावण्यात आलं होतं, त्याला 304 कलमाची जोड देण्यात आली आहे. 

304 अ आणि 304 मध्ये फरक काय?
सुरुवातीच्या एफआयआरमध्ये आरोपीविरोधात 304 अ कलम लावण्यात आलं होतं. मात्र त्यात बदल करून 304 कलम करण्यात आलं. दारूच्या  नशेत कारचा अपघात करण्यासाठी 304 अ कलम लावलं जातं. यासाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याअंतर्गत गुन्ह्यात जामीन मिळू शकतो. तर 304 हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येते. 

Advertisement

नक्की वाचा - पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक
  
अपघातावेळी कार ड्रायव्हर चालवत होता का? 
अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघेजणं होतं. अल्पवयीन आरोपी, ड्रायव्हर आणि त्याचे दोन मित्र. सुरुवातीला ड्रायव्हरने तो कार चालवित असल्याचा जबाब दिला होता. या प्रकरणात त्याच्यावर कोणी दबाव आणला का, याचाही तपास पुणे पोलिसांकडून घेतला जात आहे. याशिवाय आरोपीचे दोन मित्र यांनीही अपघातावेळी कार ड्रायव्हर चालवत असल्याचं सांगितलं होतं. मात्र अपघातावेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. 

येरवडा तुरुंगात पिझ्झा पार्टी झाल्याच्या चर्चेवर चौकशी सुरू असल्याचं आयुक्तांकडून सांगण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आरोपी मुलाच्या नावाखाली एक तरुण रॅप साँग गाताना दिसत आहे. यावरही आयुक्तांना प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र व्हिडिओतील व्यक्ती आरोपी नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं आणि हा व्हिडिओ कोणी केला याचाही तपास केला जात आहे. 

Advertisement

अल्पवयीन आरोपीला सज्ञान म्हणून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आयुक्त पुढे म्हणाले, ही केस रक्ताच्या अहवालावर अवलंबून नाही. आमच्याकडे आरोपी पबमधील सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यात आरोपी मद्य पिताना दिसत आहे. त्यामुळे आमच्या केसची दिशाच वेगळी असल्याचं आयुक्त म्हणाले.