जाहिरात

पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक

मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली, असा कबुलीजबाब अल्पवयीन आरोपीने पोलीस चौकशीत दिला.

पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक
पुणे:

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात दोन संगणक अभियंते अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी पुण्यातील व्यावसायिक ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चालवत असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र त्याची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याला त्याच दिवशी जामीन मिळाल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विशाल अग्रवाल काल रात्री फरार झाला होता. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. छत्रपती संभाजीनगरमधून पोलीस दलाने अखेर त्याला अटक केली आहे. 

वेदांतच्या वडिलांना का केली अटक?
20 मे रोजी अल्पवयीन मुलाचा पबमधला सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. यामध्ये वेदांत मद्यप्राशन करीत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणानंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्या विरूद्ध पोलिसांनी बाल न्याय कायदाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल आणि आरोपी मुलाचे वडील यांच्यावर पोलिसांनी मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 3, 5 आणि 199 अनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन चालवायला दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल झाले होते फरार
पुणे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल पसार झाल्याची माहिती होती. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख विशाल अग्रवाल पोलिसांना सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल यांना संभाजीनगरमधून अटक केली आहे. पुणे पोलिसांनी आज पहाटे संभाजीनगरमधून त्यांना अटक केली आहे. दुपारपर्यंत पोलीस त्यांना पुण्यात घेऊन येणार आहेत.

नक्की वाचा - रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड

आज पुण्यात करणार हजर
पुणे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून पहाटे करण्यात आली आहे. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख विशाल अग्रवाल पोलिसांना सापडत नसल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. आज पहाटे विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने एक तरुण आणि एका तरुणीचा शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमधे मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोर्शे कारची नोंदणी नाही...
अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी जी कार चालवत होता त्या कारची नोंदणी झालेली नव्हती आणि तरीही तो ती कार चालवत होता. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार विनाक्रमांक व विनानोंदणी होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, अपघातग्रस्त कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे. या अपघातात पोर्शे कारचा स्पीड 170-180 किमी प्रतितास असल्याची माहिती समोर आली आहे. 

मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली - अल्पवयीन आरोपीचा कबुलीजबाब 
मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीही वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे, असे आरोपी अल्पवयीन आरोपीने पोलीस जबाबात सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली. 

बार चालकाविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. या प्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, आरोपी अल्पवयीनच असून, जन्माचा पुरावा मिळाला आहे. मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत.

न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी 
अपघातानंतर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला. मुलाला न्यायालयाने 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास सांगितले. तसेच, ‘अपघात' या विषयावर निबंध लिहिण्याची अट घातली. तसेच त्याला येरवडा वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियमन करण्यास सांगितलं आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या करोडपतीच्या मुलाला निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांसोबत काम करणे अशा शिक्षा  असतात का? असा सवाल शहरवासियांनी व्यक्त केला आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
आता पती पत्नींच्या मार्गातला काटा का ठरतोय? अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
पुणे अपघातात मोठी अपडेट, फरार झालेल्या विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून अटक
Sangli Murder case Kabaddi player killed in Sanglis Jamwadi
Next Article
कानाखाली लगावली, बदला म्हणून 5 अल्पवयीन मुलांनी केलं भयंकर कृत्य, तुम्ही ही थक्क व्हाल