सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारनं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्ताच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. या दोघांनाही 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे पोलिसांनी अटक करताच डॉ़ तावरे यांनी गंभीर इशारा दिला असून त्यामधून या प्रकरणाचं खरं सत्य बाहेर येऊ शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेल' असा इशारा डॉ. तावरे यांनी दिलाय. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणि ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आली याचे संकेत तावरे यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या माहितीच्या अधारे डॉ. तावरे, डॉ. हरलोर आणि या प्रकरणातील मध्यस्थ अतुल घटकांबळे या तिघांना अटक केलीय. या सर्वांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
( नक्की वाचा : नातवाला वाचवायला आजोबांनी केला होता प्लॅन, पुणे पोलिसांचा गौप्यस्फोट )
ससूनमधील डॉक्टरांचं बिंग कसं फुटलं?
ससूनमध्ये रक्ताचा नमुना दिल्यानंतर पुणे पोलिसांनी औंध रुग्णालयातही अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला होता. हा नमुना दुर्घटनेच्या वीस तासांनंतर देण्यात आला होता. औंधमध्ये अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांची डीएनए चाचणी करण्यात आली, जी मॅच झाली. मात्र ससून रुग्णालयात घेतलेला रक्ताच्या नमुन्याची डीएनए चाचणी आरोपीसोबत मॅच झालेली नाही. यानंतर तावरे आणि हरलोल यांनी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल केल्याचं उघडकीस आलं. पुढे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, दुसऱ्यांदा रक्ताचा नमुना अल्कोहोल तपासण्यासाठी घेण्यात आलेला नाही. तर यामुळे पहिल्या नमुन्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं. दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी दिलेला नमुना कोणाचा होता, याचाही युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
( नक्की वाचा : विशाल अग्रवालच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार चिडून म्हणाले... )
अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्याशी थेट संपर्क केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यासाठी विशालने त्यांना कसली ऑफर दिली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यातच डॉ. तावरे यांनी हा इशारा दिल्यानं तो कुणाचं नाव घेतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.