अमोल गावंडे, प्रतिनिधी
दारूचं व्यसन हे आरोग्यासह नातेसंबंधासाठीही धोकादायक ठरलं. दारूचं व्यसनातून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आपण पाहिलं आहे. दारू ही खिशाला लागलेलं भोक असल्याचं म्हटलं जातं. कोणत्याही व्यसनातून आर्थिक अडचणींसह नातेसंबंधातही दुरावा निर्माण होतो. व्यसन सोडवणं अवघड असलं तरी अशक्य नाही. व्यसनमुक्ती केंद्र, औषध, योगा आदींच्या मदतीने व्यसनमुक्ती शक्य आहे.
मात्र अनेकजणं दारूचं व्यसन सुटावं म्हणून बाबा बुवाच्या आहारी गेल्याच्या घटना घडतात. अशा ठिकाणी उपचाराऐवजी नागरिकांची फसवणूक होते. असाच एक प्रकार बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथून समोर आला आहे. येथील एक भोंदू बाबा दारू सोडवण्याच्या नावाखाली अमानुषपणे मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भोंदू बाबा त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका व्यक्तीला तुफान मारहाण करीत आहे.
नक्की वाचा - आजीचा पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावरील धमाकेदार डान्स, लोक म्हणाले - रॉकिंग आजी
नागरिकांच्या अगतिकतेचा फायदा घेत झोला छाप डॉक्टर किंवा ढोंगी बाबांनी उपचाराच्या नावाखाली फसवण्याची दुकानं थाटल्याचं आपण पाहतो. काही भोंदू बाबा दारू सोडवण्याचा दावा करत लोकांवर उपचाराच्या नावावर अमानुषपणे मारहाण करतात. घाटनांद्रा मारहाणीचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. शिवाजी पुंडलिक बर्डे उर्फ शिवा महाराज यांचा बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावाजवळ धारेश्वर संस्थान म्हणून आश्रम आहे. या ठिकाणी ते दारू सोडविणाऱ्यासाठी उपचार करतात. त्यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीला उपचाराच्या नावाखाली त्यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. मारहाण केलेल्या व्यक्तीने तक्रार केली तर महाराजाविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिली आहे.
टीप - लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या मुक्तांगण ही संस्था व्यसनमुक्तीसाठी काम करते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world