कोकणात फिरायला जाताय? 'शोधून जीवे मारू...' रत्नागिरीत मुंबईच्या पर्यटकासह कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत धमकी

Ratnagiri News: रत्नागिरीतील आरे-वारे परिसरात मुंबईतील दहिसर येथील व्यापारी प्रवीण कोरगावकर यांच्या कुटुंबावर चार अनोळखी तरुणांनी हल्ला केला. गाडी अडवून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ratnagiri News: रत्नागिरीत मुंबईतील पर्यटकासोबत भयंकर घडलं"
NDTV Marathi

- राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Ratnagiri News: निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील आरे-वारे परिसरात मुंबईतील एका पर्यटकाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील दहिसर येथील व्यापारी प्रवीण कोरगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना चार अज्ञात तरुणांनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

मुंबईच्या पर्यटकासोबत रत्नागिरीत काय घडले?

दहिसर (पश्चिम) भागात राहणारे व्यापारी प्रवीण हरिश्चंद्र कोरगावकर हे आपल्या कुटुंबासह 2 मे रोजी रत्नागिरी पर्यटनासाठी आले होते. संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरे-वारे परिसरातून जात असताना, दोन गाड्यांमधून आलेल्या चार तरुणांनी कोरगावकर यांची गाडी ओव्हरटेक करण्याच्या बहाण्याने अडवली. गाडी आडवी लावून रस्ता अडवल्यानंतर या टोळक्याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Advertisement

(नक्की वाचा: Judge Death Case: न्यायाधीशाची आत्महत्या की सासरचा जाच? जज पत्नी आणि IAS मेहुणीविरोधात गुन्हा दाखल, तपासात मोठा ट्विस्ट)

कुटुंबातील सदस्यांवर हल्ला

वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. या टोळक्याने प्रवीण कोरगावकर यांच्या डोक्यात, कानावर आणि हातावर जोरात बुक्क्या मारल्या. यावेळी त्यांची पत्नी स्नेहल यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हल्लेखोरांनी प्रवीण यांचा भाऊ गिरीश यांचे बोट मुरगळले, तर पुतण्या सार्थक याच्या छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले.

Photo Credit: NDTV Marathi

पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी

मारहाणीनंतर कोरगावकर कुटुंबीय तेथून निघाले असता, आरोपींनी काही अंतरापर्यंत त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. "आम्ही तुमचा गाडी नंबर लिहून घेतला आहे, तुम्हाला शोधून शोधून जीवे मारू," अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी प्रवीण कोरगावकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तरुणांचा शोध घेत आहेत.