राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये एका व्यक्तीला अज्ञाताने ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. थोडेथोडके नव्हे तर या व्यक्तीने तब्बल 24 लाख 85 हजार रुपये गमावले आहेत. विक्रांत विजय दांडेकर (वय 40 वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष विक्रांत दांडेकर यांना दाखवण्यात आले होते. याच आमिषाला बळी पडल्याने दांडेकर यांची मोठी फसवणूक झाली.
(नक्की वाचा: उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला)
दांडेकर हे खेड शहरातील एकवीरा नगर येथील रहिवासी असणारे आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. फवसवणुकीची ही घटना 19 एप्रिल ते 24 मे या कालावधीत घडल्याचे दांडेकर यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
(नक्की वाचा: ढाब्यावाल्याने पार्सलचे पैसे मागितले, त्याने चॉपर काढला; अन् मग... )
कशी झाली फसवणूक?
फेसबुकचा वापर करत असताना विक्रांत दांडेकर यांना शेअर मार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केले असता व्हॉटसअॅप ग्रुपवर जॉइन करा, असा मेसेज मिळाला. ग्रुप जॉइन केल्यानंतर तुमचे पैसे कंपनीमध्ये गुंतवून जादा परतावा मिळवून देऊ असं आमिष दाखवण्यात आले. जादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडत विक्रांत यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी 24 लाख 85 हजार रुपये जमा केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
(नक्की वाचा: सावत्र बापाने 3 वर्षीय लेकीसोबत केले भयंकर कृत्य, तुमचाही संताप होईल अनावर)