Ratnagiri News : सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तो मेसेज अन् शिक्षकांचे लाखो रुपये गायब

दोन शिक्षकांच्या खात्यातून मिळून 7 लाख 56 हजार 514 रुपये गायब करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Ratnagiri News : एका शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ६ लाख ८५ हजार ५१४ आणि दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यातून ७१ हजार अशी एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची मोठी रक्कम गायब केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.४५ ते १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७.३० च्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. (Financial fraud with retired teachers)

‘बँक ऑफ इंडिया' च्या नावाखाली पीडीएफ पाठवली

फिर्यादी बावडे हे ज्या ‘सेवानिवृत्त शिक्षकांचे संदखोल केंद्र' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत, त्याच ग्रुपवर आरोपी असलेल्या अज्ञात मोबाईल धारकाने ‘बँक ऑफ इंडिया' संबंधित माहितीची एक अनोळखी आणि बनावट ‘पीडीएफ' तसेच एक ‘एपीके' (APK) फाईल पाठवली. जयगड-संदखोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट बँक पीडीएफ फाईल उघडताच अज्ञात हॅकरने त्यांच्या बँक खात्याचा अॅक्सेस मिळवून त्यांच्यासह अन्य एका शिक्षकाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची रक्कम लंपास केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. 

नक्की वाचा - EX Girlfriend ला किस करणं पडलं महागात; गावकऱ्यांनी तरुणाच्या शरीराचे अवयव गोळा करून रुग्णालयात पोहोचवलं

क्लिक करताच मिळाला मोबाइलचा कंट्रोल...

फिर्यादी नासिर बावडे यांनी ही अनोळखी फाईल आपल्या मोबाईलमध्ये ‘डाऊनलोड' करून उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस (नियंत्रण) मिळवला. यानंतर आरोपीने बावडे यांच्या ‘बँक ऑफ इंडिया'च्या पगार खाते आणि बचत खात्यामधून त्यांच्या परवानगीशिवाय ६ लाख ८५,५१४ इतकी मोठी रक्कम परस्पर अनोळखी बँक खात्यावर वळती केली. विशेष म्हणजे आरोपीने याच पद्धतीने साक्षीदार शिला शंकर वाघधरे (रा. अंबुवाही) यांच्या ‘बँक ऑफ इंडिया' खात्यामधून देखील ₹७१,००० रक्कम काढून घेतली. अशाप्रकारे फिर्यादी आणि साक्षीदार दोघांची मिळून एकूण ₹७,५६,५१४/- रुपयांची फसवणूक झाली.

Advertisement

जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

सायबर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच बावडे यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (सी), ६६(डी) प्रमाणे सायबर फसवणूक, ओळख चोरी आणि संगणक स्त्रोत कोडचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयगड पोलीस या अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी अनोळखी लिंक आणि फाईल्स डाऊनलोड करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.