अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानातून पाचव्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असून हा सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन नेमबाजांना पैसे पुरवणे आणि रेकी करण्यासाठी मदत करीत होता. आज चौधरीला मुंबईल आणण्यात आले असून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे.
सलमान खान निवासस्थानावरील गोळीबार प्रकरणात आतापर्यंत सागर पाल (21) आणि विक्की गुप्ता (24) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. या आरोपींना मुंबईत घर भाड्याने घेणं, हल्ला करण्यासाठी बाईक खरेदी करणे यासाठी एक लाख रुपये देण्यात आले होते. त्यांना सुपारीसाठी किती पैसे देणार याबाबत सांगण्यात आले नव्हते.
नक्की वाचा - Salman Khan House Firing Case: आरोपींकडे होती 40 काडतुसे, गोळीबारानंतर 3 वेळा बदलले कपडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना चांगलं काम करा, तुमची काळजी घेतली जाईल असं सांगितलं होतं. 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी निवासस्थानी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात दोघांना अटक करण्यात आली होती. आता आणखी एकाला राजस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे.