- शरद सातपुते, सांगली
सांगलीतील संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे तीन जणांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. मयुरेश चव्हाण (वय 30 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रागाने पाहिले आणि शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी (10 जून) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. प्रतीक शितोळे (वय 23 वर्ष), गणेश खोत (वय 30 वर्ष), सिद्धनाथ लवटे (वय 25 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. यापैकी दोन जण सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांवर गुन्हे देखील दाखल आहेत. गणेश खोतविरोधात कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये आर्म अॅक्टचा, तर प्रतीकविरोधात शहर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुरळे यांनी दिली.
(नक्की वाचा: सासऱ्याच्या हत्येमागे बहिणीसह MSME विभागाच्या संचालकांचा हात, दोघेही अटकेत)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश दीड वर्षापासून बोळाज प्लॉट येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. डोळ्यांच्या रुग्णालयामध्ये मयुरेश हेल्पर म्हणून काम करत होता. कामावरून निघाल्यानंतर तो बाइक घेऊन कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्थानक रस्त्यावरील दारूच्या दुकानाजवळ गेला. येथे एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून त्याचे तीन जणांसोबत भांडण झाले. हा वाद मिटल्यानंतर चौघेही होळकर चौकातील दारूच्या दुकानाजवळ आले. येथे पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली.
(नक्की वाचा: अभिनेत्रीला अश्लील फोटो, नाल्यात मृतदेह आणि स्टारला अटक! मर्डर मिस्ट्रीचं रहस्य काय?)
यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की या तिघांनी दगड उचलून मथुरेशच्या डोक्यात घातले आणि घटनस्थळावरून पळ काढला. मंगळवारी (11 जून) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. संजयनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळेस त्याच्या डोक्यावर पाच ठिकाणी घाव करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दरम्यान 12 तासांतच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या तिघांनीही मयुरेशची हत्या केल्याची कबुली देखील तपासादरम्यान दिली.
(नक्की वाचा: प्रेयसी-प्रियकराचे कडाक्याचे भांडण, त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन केले भयंकर कृत्य)