सांगली शहरात एका चारचाकी गाडीतून महिलेचा मृतदेह फिरवण्यात आला होता. ही कार सांगली बस स्थानकात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्यात संशयास्पद हालचाली दिसल्या आणि धक्कादायक प्रकार समोर आला. गर्भपातादरम्यान या महिलेचा कर्नाटकात मृत्यू झाला होता. मात्र तेथे मृत्यूचं प्रमाणपत्र मिळत नसल्याने ते सांगली शहरातील रुग्णालयांमध्ये फिरत होते. मात्र ते सांगली बस स्थानकात थांबले, आणि त्यांचं बिंग फुटलं. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला.
या प्रकरणात कविता नावाच्या नर्सला ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कविता महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक डॉक्टरांच्या संपर्काक होती. ही महिला कर्नाटकातील महालिंगपूर भागात राहत होती. धक्कादायक म्हणजे राहत्या घरात कविता महिलांचे बेकायदेशीरपणे गर्भपात करीत होती. सांगली आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर ही बाब उघड झाली आहे. ही नर्स वेगवेगळ्या डॉक्टरांच्या संपर्कात होती. त्यांच्या माध्यमातून ती महिलांचे बेकायदेशीरपणे गर्भपात करीत असल्याची शक्यता आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या महिलांचे गर्भलिंगनिदान कुठे केले जात होते, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. कविता नर्स स्वत:च महिलेचे गर्भलिंगनिदान केल्यानंतर त्यांचे गर्भपात करीत होती का, याबाबतही तपास सुरू आहे.
नक्की वाचा - गर्भपातादरम्यान मृत्यू, कारमधून महिलेचा मृतदेह शहरभर फिरवला; भयंकर प्रकार पाहून पोलिसही हादरले!
आतापर्यंत या प्रकरणात सांगली पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चिकोडी भागात गर्भपातादरम्यान एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेवाईक त्या महिलेच्या मृतदेहासह चार चाकीतून सांगलीत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिला मिरज तालुक्यातील एका गावची माहेरवाशी आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तिचं सासर आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे. तिला दोन मुले आहेत. ती गरोदर असल्याने घरातील नातेवाईकांनी काही दिवसापूर्वी एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहवाल मिळतात त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटकातील चिकुडी येथे महालिंगपूर गाठले. गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world