शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Crime : सांगलीच्या ईश्वरपूर येथे 8 वी मध्ये शिक्षण घेणार्या शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ईश्वपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पीडिता विवस्त्र अवस्थेत रस्त्यांवर चालत होती...
पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8 वीमध्ये शिक्षण घेते. पीडिता आईसमवेत ईश्वरपूरमध्ये राहते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली. तसेच अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली.
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतिक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
