घरात खेळत असताना एका छोट्याशा चुकीमुळे 7 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील सदर बझार येथे घडली. या दुर्घटनेत क्रिशांत योगेश फडतरे या 7 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये चिमुरड्यासोबत नेमकं काय घडलं हे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या अंगणातील गेटच्या दरवाज्याशी दोघेजणं खेळत होते. दोघेही भलामोठा लोखंडी गेट खेचण्याचं आणि बंद करण्याचा खेळ खेळत होते. अशातच दोघांनी लोखंडी गेट ओढून संपूर्ण उघडला. यावेळी गेट न अडकता हुकमधून बाहेर आला आणि बाहेरच्या बाजूला पडला. यावेळी बाहेरच्या बाजूला क्रिशांता गेट धरून उभा होता. हा लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडला. यानंतर समोरील मुलालाही तो गेट उचलणं शक्य झालं नाही. काही वेळाने एक महिला आणि एक पुरुष बाहेर आले. दोघांनी गेट उचलला आणि मुलाला बाहेर काढलं. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र यातच त्याचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - पार्टीसाठी कोंबडा दिला नाही म्हणून हत्या करुन जाळलं; चंद्रपुरातील घटनेने खळबळ
जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिशांत हा दुपारी घरासमोर खेळत होता. त्यावेळी गेटचा लोखंडी दरवाजा त्याच्या नाकाला आणि गालाला लागला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला अन्य एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडत गेली. यातच त्याचा मृत्यू झाला. क्रिशांतच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी हंबरडा फोडला. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.