शिळफाटा : पुजाऱ्यांनी बलात्कार अन् हत्या केलेल्या महिलेला न्याय मिळणार!  मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना 

शिळफाट्याजवळील (Shilphata Ganesh Ghol Mandir) गणेश घोळ मंदिरात तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

शिळफाट्याजवळील (Shilphata Ganesh Ghol Mandir) गणेश घोळ मंदिरात तीन पुजाऱ्यांनी एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निघृणपणे हत्या केली. भरगर्दीच्या भागात हा धक्कादायक प्रकार घडला. घरातील वादाला कंटाळल्यामुळे शांततेसाठी मंदिरात आलेल्या महिलेला चहातून नशेचं औषध देऊन येथील  पुजाऱ्यांनीच आळीपाळीने बलात्कार केला. सकाळी जेव्हा महिलेला हे लक्षात आलं, तेव्हा तिने आरडाओरडा सुरू केला. यानंतर तिघांनी महिलेची निघृणपणे हत्या करीत झाडाझुडपात फेकून दिलं. भाविकाला या महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

दरम्यान या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत.

नक्की वाचा - पुजाऱ्याच्या रुपात हैवान! मुंबईतील मंदिरात 30 वर्षीय महिलेवर आळीपाळीने अत्याचार, पुढे भयंकर घडलं!

ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलिसांकडे 498 ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.