सुनिल दवंगे
साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो भाविक दररोज दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. त्याच पवित्र तीर्थक्षेत्रात सध्या एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीत दिवसाढवळ्या शरीरविक्रीचा धंदा होत असल्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. याची स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला उघडपणे शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शरीरविक्रीच्या व्यवसायाची माहिती देताना दिसत आहे. त्यात ती ग्राहक कसे टिपले जातात, त्यांना कुठे आणि कशा प्रकारे नेलं जातं, किती वेळात व्यवहार पूर्ण होतो, हे सगळं ती स्पष्टपणे सांगते. या व्हिडीओमुळे शिर्डीकरांना मात्र धक्का बसला आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, हा सर्व प्रकार शिर्डी नगरपरिषद कार्यालय, प्रांत कार्यालय आणि अगदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी कार्यालयाच्या अगदी समोर चालत असल्याच दिसून येत आहे.
काय म्हणते संबधीत महिला?
आम्ही अनेक दिवसापासून येथे बसतो. ग्राहक मिळाला की लॉजवर घेवून जातो. आम्ही थेट कोणासोबत बोलत नाही. ज्याला गरज आहे तो लाईन देतो. मगच आम्ही त्याला लॉजवर घेवून जातो. मी संगमनेरहून आली आहे असं ही महिला सांगते. शिर्डीत गणेशवाडी भागात चार हजार रुपयांची रुम भाडोत्री घेवून राहते. येथे दोन तीन तास थांबते, मी एकटीच नाही तर महाराष्ट्रतून अनेक जण येथे येतात. लॉजवर आधारकार्ड घेतात मग आम्ही तिथे जातो असं ही ती या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
शिर्डीच्या मध्यवस्तीत, भरदिवसा ही कृत्यं सुरू आहेत. पोलिस, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा धक्का लावण्याचा हा प्रकार आहे. या प्रकारामुळे केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर साईभक्त देखील संतप्त झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वास्तविक, शिर्डी हे देशातील नंबर दोन आणि राज्यातील क्रमांक एकच तसेच अधिक पोलिस बंदोबस्त असलेलं तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. तरीदेखील इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी, प्रशासनाच्या नजरेखालून इतकी मोठी शरिरविक्रीची साखळी सुरू असणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल.
शिर्डीत दररोज सुमारे 50 हजार ते 1 लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येतात. या गर्दीचा फायदा घेत अशा अनैतिक प्रवृत्ती हळूहळू पाय रोवत असल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होतं. शिर्डीतील अनेक गल्ली बोळातील लॉजवर अगदी बिनधास्त हा प्रकार चालतो. यातील सर्वाधिक हॉटेल, लॉज हे स्थानिकांचेच असून देखिल हा प्रकार चालतो यावर आता सर्व स्तरातून टीका होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर याची तातडीने चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. शिवाय दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महिला आयोगाने यात लक्ष घालावं, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.