शिवसेनेचे पालघरमधील नेते अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर सापडला आहे. 12 दिवसापूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर ते बेपत्ता होते. अखेर त्यांची कार गुजरातमधल्या एका दगड खाणीतल्या पाण्यात सापडली आहे. त्या कारच्या डिकीमध्ये एक मृतदेह सापडला आहे. तो मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचं बोललं जात आहे. अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पोलीसांना यश आलं असलं तरी त्यांची हत्या कशी झाली आणि त्यामागचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसां समोर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरणाने खळबळ उडाली होती. 20 जानेवारीपासून अशोक धोडी हे बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणात अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडीलाही पोलीसांनी ताब्यात घेतले होते. मात्र तो पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला होता. शिवाय अशोक धोडी यांच्या अपहरण किंवा हत्ये मागे त्यांच्या सख्ख्या भावाचा हात असल्याचा पोलीसांचा संशय ही बळावला होता.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: चिकनची पार्टी जीवावर बेतली, खारघरमध्ये भयंकर घडलं
काही आरोपींनी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तांत्रिक तपास ही सुरू होता. शेवटी हा तपास गुजरातमध्ये बंद पडलेल्या दगडाच्या खाणीपर्यंत येवून थांबला. पोलीसांनी खाणीतल्या पाण्यातून अशोक धोडी यांची कार बाहेर काढली. जवळपास 40 ते 45 फूट खोल पाण्यात ही गाडी टाकण्यात आली होती. दोन क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. त्यावेळी गाडीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होते. यावेळी धोडी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी गुजरातचे पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले होते. शिवाय पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील ही घटनास्थळी दाखल झाले होते. ही गाडी गुजरातच्या भिवाडी गावातल्या एका खाणी आढळल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करणे बाकी आहे. ते ताब्यात आल्यानंतर अनेक गोष्टी उलगडतील असंही ते म्हणाले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. शिवाय वेगवेगळे आरोपींचा वापर या गुन्ह्यात झाला आहे. या प्रकरणाच छडा लावण्यासाठी आठ पथकं तयार केल्याचेही पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान या गाडीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. हा मृतदेह सडला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवली जाणार आहे. हा मृतदेह अशोक धोडी यांचा असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. पुर्वीच्या दुष्मनीतून हा खून झाल्याचं पोलीसांचे म्हणणे आहे. यात धोडी यांचा सख्खा लहान भाऊ असल्याचं ही पोलीसांनी म्हटलं आहे. सध्या त्यांचा भाऊ फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world