प्रतिनिधी, सूरज कसबे
पुण्यातील उच्चभ्रू आयटीनगर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्यवसायातून चार पीडित परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यातील एका परदेशी दलाल महिलेला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला गुप्त बातमीदाराकडून एक टीप मिळाली होती. एक परदेशी महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांचा शोध घ्यायची. याशिवाय ग्राहकांनाच लोणावळा परिसरात व्हिला बुक करायला सांगत असल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय जास्त पैशांचं आमीष दाखवून थायलंडच्या तरुणींंकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.
नक्की वाचा - Crime news: लेकीची चूक, आईनं अशी शिक्षा दिली की अंगाचा थरकाप उडेल, पण शेवटी...
पोलिसांना याबाबतची टीप मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्लान आखला. त्यानुसार एक कर्मचारी या दलाल महिलेच्या संपर्कात आला. त्याने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसारसाई येथे एक व्हिलाही बुक केला. त्यानंतर ही दलाल महिला थायलँडच्या त्या चार तरुणींना घेऊन व्हिलावर पोहोचली. अखेर काल 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास कासारसाईच्या सूर्य व्हिला येथे छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने 1 परदेशी महिलेच्या ताब्यातून 4 परदेशी पीडित तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. यावेळी महिलेकडून एक मोबाइल, 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. दलाल महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी , पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख दिगंबर सूर्यवंशी, संभाजी जाधव, सुनील शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुडे, गणेश कारोटे, मुकुंद वारे, श्रद्धा भरगुडे, नीलम बुचडे, संगीता जाधव यांनी ही कामगिरी केली आहे.