Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शेतातील जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारशिवनी परिसरातील एका शेतामध्ये कचऱ्याला आग लागल्याचं समोर आलं होतं. या जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अचानक प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांचे लक्ष तिथे गेले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक मानवी मृतदेह जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं.
ओळख पटवणे कठीण, 'डीएनए' चाचणीची शक्यता
घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कचऱ्यामध्ये हा मृतदेह इतक्या वाईट रितीने जळाला आहे की, मृत व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, हे ओळखणेही कठीण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत व्यक्तीचे वय ५० ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावं. घटनास्थळावर पोलिसांना कोणतेही ओळखपत्र, संशयास्पद साहित्य अथवा पुरावे सापडलेले नाहीत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तात्काळ शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुढील टप्प्यात डीएनए तपासणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना हत्या आहे, आत्महत्या आहे की एखादा अपघात? या सर्व शक्यतांचा विचार करून पारशिवनी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणातील गूढ उकलण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.