- 86 वर्षीय निवृत्त आर्किटेक्ट आर. सी. सभरवाल यांच्या घरात नोकराणीने बनावट ED छापा टाकून चोरी केली.
- आरोपींनी आयटीबीपी गणवेशाचा वापर करून 3 ते 4 लाख रुपये आणि 7 महागडी घड्याळे लंपास केली.
- पोलिसांनी 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून मुख्य आरोपी नोकराणी रेखा देवी यासह तिघांना अटक
चित्रपटातील कल्पित कथा प्रत्यक्षात उतरवत एका नोकराणीने आपल्याच मालकाच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाचा म्हणजेच ED चा बनावट छापा टाकला. ही धक्कादायक घटना दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी परिसरात घडली आहे. 86 वर्षीय निवृत्त आर्किटेक्ट आर. सी. सभरवाल यांच्या घरात शिरून आरोपींनी 3 ते 4 लाख रुपये आणि 7 महागडी घड्याळे लंपास केली. याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यांनी ही तातडीने कारवाई केली. त्यासाठी 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात एका फुटेजमुळे या संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. या प्रकरणातील मास्टरमाईंड नोकराणीसह तिच्या साथीदारांना अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वच जण थक्क झाले आहेत.
11 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत आरोपींनी आयटीबीपी (ITBP) गणवेशाचा वापर करून सभरवाल यांच्या कुटुंबावर दबाव टाकला होता. तपासादरम्यान पोलिसांनी दिल्ली ते गाझियाबादपर्यंतच्या 350 कॅमेऱ्यांचे विश्लेषण केले. संशयित कारचा क्रमांक मिळाल्यानंतर तांत्रिक पाळत ठेवली असता, घटनास्थळी सक्रिय असलेले मोबाईल क्रमांक आणि गाझियाबादमधील एका घराचा पत्ता यांचा मेळ लागला. तपासात सभरवाल यांच्याकडे काम करणारी रेखा देवी ही मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस त्यानंतर तिच्या पर्यंत सहज पोहोचले.
पोलिसांनी रेखा देवी आणि तिची वहिनी पूजा राजपूत यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची 7 घड्याळे, दागिने, बनावट ओळखपत्रे, वायरलेस सेट आणि पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रेखा देवी नावाच्या नोकराणीने घराची खडान् खडा माहिती आपल्या साथीदारांना दिली होती. 11 फेब्रुवारीला तीन जण अधिकारी बनून घरात घुसले. त्यांनी घरातील सर्वांचे फोन काढून घेतले. चौकशीचे नाटक करत 4 लाख रुपये रोख आणि महागडी घड्याळे घेऊन पळ काढला. तक्रारदाराच्या नातवाला संशय आल्याने त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गाझियाबादपर्यंत पाठलाग करून या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलांना बेड्या ठोकल्या. यात एका निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.
असा लागला छडा:
- सीसीटीव्ही फुटेज: पोलिसांनी परिसरातील 350 हून अधिक कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
- वाहन ओळख: संशयित कार सराय काले खान मार्गे यूपीमध्ये गेल्याचे दिसले.
- मोबाईल लोकेशन: घटनास्थळी आणि गाझियाबादमध्ये सक्रिय असलेल्या संशयास्पद मोबाईल नंबरमुळे नोकराणीचे बिंग फुटले.
- जप्त मुद्देमाल: 7 महागडी घड्याळे, रोकड आणि बनावट पोलीस गणवेश.
फरार आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यात प्रकाश (ITBP कॉन्स्टेबल), मनीष आणि उपदेश सिंह थापा हे तिघे सहभागी असून ते सध्या फरार आहेत. नोकराणीने घराची पूर्ण माहिती दिल्याने आरोपींना चोरी करणे सोपे झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून नागरिकांना घरगड्यांची माहिती पोलिसांत नोंदवण्याचे आवाहन केले आहे. काही वर्षा पूर्वी अक्षय कुमारचा स्पेशल 26 ही चित्रपट आला होता. त्यात अशा पद्धतीने बनावट रेड टाकल्या जात होत्या. त्यातून लाखोची कमाई केली जात होती. तसाच काहीसा फॉर्म्यूला या केसमध्ये वापरला गेल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनं पोलीस ही आवाक झाले आहेत.