रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीतील पार्किंगमध्ये शुभदा कोदारे या तरुणीचा कार्यालयातील एका सहकाऱ्याने हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारण असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान शुभदा कोदारे हत्या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. शुभदा खोटं सांगून कृष्णाकडून पैसे उकळत होती. आपल्यासोबत विश्वासघात झाल्याचं लक्षात आल्यावर तिला अद्दल घडविण्यासाठी कृष्णाने शुभदावर पार्किंगमध्ये हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शुभदाकडून विश्वासघात...
शुभदा हत्या प्रकरणात आरोपी कृष्णाने सांगितलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून शुभदाने कृष्णाचा विश्वासघात केला होता. कृष्णाला शुभदाला मारायचे नव्हते पण अद्दल घडवायची होती. विश्वासघाताची आग मनात ठेवत कृष्णाने शुभदावर हल्ला केला होता. वडील आजारी आहेत असं सांगत शुभदाने वेळोवेळी कृष्णाकडून पैसे मागितले होते. मात्र जेव्हा तिच्या वडिलांना कुठला ही आजार नसल्याचं लक्षात आल्यावर कृष्णाला धक्का बसला आणि त्याने शुभदाला अद्दल घडवायचं ठरवलं.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्याच्या IT कंपनीत तरुणीची हत्या, सहकाऱ्याने पार्किंगमध्ये गाठलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीमध्ये काम करीत होते. शुभदाने वडील आजारी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याचं सांगून कृष्णाकडून कधी 25 हजार तर कधी 50 हजार असे एकूण 4 लाख रुपये उकळले होते. एवढ्यावर न थांबता शुभदा आणखी पैसे कृष्णाला मागू लागल्याने त्याचा संशय बळावला. कृष्णाने थेट शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिच्या घरी जाताच कृष्णाला धक्का बसला. तिचे वडील अगदी ठणठणीत होते. कृष्णाने त्यांना विचारले असता मला कुठला ही आजार नाही आणि माझ्यावर कुठली ही शस्त्रक्रिया केली गेली नाही आणि होणार नाही असं त्यांनी सांगितलं.
सत्य समोर आल्यावर कृष्णाने शुभदाकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यातून त्या दोघांमध्ये अनेक वेळा वादावादी झाली. काल 8 जानेवारी रोजी कृष्णाने शुभदाला अद्दल घडावी हा मानस ठेवत थेट कंपनीच्या पार्किंगमध्ये तिला गाठलं आणि तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात शुभदा हिच्या उजव्या हाताच्या नसा तुटल्या. या हल्ल्यानंतर तिची शुगर कमी झाली, परिणामी तिचे रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि यात तिचा मृत्यू झाला.