मनोज सातवी, पालघर
Maharashtra Day: महाराष्ट्र दिनी 'ड्राय डे' घोषित केलेला असतानाही बेकायदेशीरित्या मद्यविक्री करणाऱ्या रेस्टॉरंटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील नागझरी नाक्यावरील नागझरी बिअर शॉप आणि रेस्टॉरंटचा मद्यविक्री परवानाच निलंबित करण्यात आला आहे. पालघर उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रात्रीच्या वेळेस तळीरामांना मद्यविक्री केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. इतकंच नव्हे तर पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा : आईला सतत होणाऱ्या मारहाणीमुळे मुलाचे टोकाचे पाऊल, वडिलांची दगडाने ठेचून हत्या)
चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी बिअर शॉप आणि रेस्टॉरंट हितेश सरवैय्या या व्यक्तीच्या मालकीचे आहे. दरम्यान मद्यविक्रीच्या नियमांचा भंग होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाकडे केल्या होत्या. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे नुकतेच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन्ही दुकानांची तपासणी केली होती आणि तपासणीदरम्यान काही नियमांचा भंग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. दुसरीकडे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ड्राय डे घोषित असतानाही या दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या मद्यविक्री केली जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आता थेटे रेस्टॉरंटचा मद्यविक्री परवानाच निलंबित केला.
(नक्की वाचा : रिक्षा पार्किंगवरून निर्घृण हत्या, 5 वर्षांनंतर कुटुंबीयांना मिळाला न्याय! आरोपींना जन्मठेप)