- अमजद खान, कल्याण
Kalyan Crime News: सोसायटीच्या गेटसमोर रिक्षा का उभी करतो? अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्थानिकाची पाच वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती.अखेर पाच वर्षांनंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. न्यायालयाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी या हत्याकांडामुळे कल्याण शहर हादरले होते. रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी मिळून संदेश घाडसी (Sandesh Ghadasi) यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये संदेश घाडसी यांचा मृत्यू झाला होता.
नरेंद्र आडविलकर आणि विनय ताम्हणकर अशी आरोपींची नावे आहेत. पाच वर्षांनंतर या दोघांनाही कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदेश घाडसी (Sandesh Ghadasi) यांच्या पत्नी साक्षी घाडसी यांनी न्याय मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. अखेर त्यांना न्याय मिळालाच. या प्रकरणाचा पोलिसांनी देखील उत्तमरित्या पाठपुरावा केला आणि सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमके काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेकडील काकाचा ढाबा परिसरामध्ये एका सोसायटीसमोर रिक्षाचालक नरेंद्र आडविलकर कायम आपली रिक्षा उभी करायचा. गेटसमोर रिक्षा लावल्याने स्थानिकांना त्रास होतो, त्यामुळे गेटसमोर रिक्षा उभी करू नका; असे संदेश घाडसी यांनी नरेंद्र आडविलकरला सांगितले होते. पण आडविलकर त्यांचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रिक्षा लावण्याच्या विषयावरून 19 मार्च 2018 रोजी नरेंद्र आडविलकर आणि संदेश घाडसी यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. या वादादरम्यान संदेश यांना नरेंद्र आडविलकर, विनय ताम्हणकरसह अन्य तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तर नरेंद्र आडविलकर-विनय ताम्हणकरने संदेशचा गळा देखील आवळला. या मारहाणीमध्ये संदेश यांचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा: लंडन हादरलं! अज्ञाताकडून लोकांवर तलवारीने सपासप वार; लहानग्याचा मृत्यू-अनेकजण जखमी)
पाच वर्षांपासून सुरू होती सुनावणी
कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. एस. भोगे करत होते. पाच वर्षांपासून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. संदेश घाडसी (Sandesh Ghadasi) यांच्या पत्नीसह काही लोकांनी न्यायालयासमोर साक्ष दिली. अखेर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने विविध कलमातंर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अन्य तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. पोलिसांच्या उत्तम तपासामुळे घाडसी कुटुंबीयांना न्याय मिळाला तर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
(नक्की वाचा : पतीला थाटायचा होता दुसरा संसार, पहिल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी रचला असा डाव)
VIDEO : जेव्हा अजितदादांना धरणाच्या 'त्या' वक्तव्याची आठवण येते
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world