सौरभ वाघमारे, सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटना, हत्येची भयंकर प्रकरणे समोर येत आहेत. कौटुंबिक भांडणातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नींमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर भागात घडली. धुळाप्पा नंदकुमार हेले असे मृत पतीचे नाव असून प्रगती हेले असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. दक्षिण सोलापूरमधील तांदुळवाडी येथे ही भयंकर घटना घडली.
नक्की वाचा: गुजरातचे 'मुन्नाभाई'; 70 हजारांत मेडिकलची डिग्री, दवाखानेही उघडले; 14 जणांना अटक
धुळाप्पा आणि प्रगती यांचा 15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, त्यांना एक 13 वर्षाची मुलगीही आहे. मृत धुळाप्पा हेले हे ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून काम करत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. गुरुवारी (ता. 5 डिसेंबर) पती पत्नीमध्ये असाच टोकाचा वाद झाला. याच वादातून दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पत्नी प्रगतीने पतीच्या डोक्यात लाडकी दांडग्याने वार करुन त्याचा निर्घृण खून केला.
धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर पत्नीने स्वतःच पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पत्नी प्रगती हेलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमविवाहाचा हा भयंकर शेवट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाची बातमी: CRR मध्ये कपात, रेपो रेट जैसे थे; महागाई नियंत्रणाचा RBI ने सांगितला प्लॅन