सौरभ वाघमारे
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा भलताच कारनामा समोर आला आहे. आपल्या वडीलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने केलेली कृती त्याच्याच अंगाशी आली आहे. शिवाय तो त्यात अतिशय वाईट पद्धतीने अडकला आहे. ही घटना सोलापूर शहरात घडली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांचे भंगारचे दुकान आहे. हे दुकान चांगले चालावे म्हणून त्याने थेट दुचाकींची चोरीचा सपाटा लावला. त्यानंतर त्याचे पार्ट तो याच भंगाराच्या दुकानात विकत होता. पण शेवटी तो पोलिसांच्या नजरेत आला. त्याच्या अनेक वाईट फसले आहेत.
साहिल महेबूब शहापुरे हा 22 वर्षाचा युवक आहे. तो सोलापूरच्या अशोकनगरमध्ये राहतो. तो सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण ही घेत आहे. त्याच्या वडिलांचे भंगारचे दुकात आहे. ते चांगले चालावे म्हणून या साहिलने आपल्याच परिसरातील दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. जवळपास 11 दुचाकी त्याने चोरल्या. त्यानंतर या दुचाकीचे तो पार्ट वेगळे करायचा. ते पार्ट तो आपल्या वडीलांच्या भंगारच्या दुकानात ठेवायचा. यातले अनेक पार्ट त्याने रहिम इरफान शेख या भंगारवाल्याला विकले होते. शहरात होणाऱ्या दुचाकी चोरींचा तपास सोलापूर पोलिस करत होते. त्याच वेळी त्यांना साहिल याची माहिती मिळाली.
सोलापूरच्या हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस साहिल संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला एका दुचाकी चोरताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. न्यायालयात हजर केला असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, सदर बाझारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वडीलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण हे कृत्य करत असल्याचं त्याने कबूल केलं आहे.
दुचाकी चोरल्यानंतर तो त्याचे पार्ट वेगळे करण्यासाठी एका व्यक्तीला भेटत असतं. त्यासाठी त्याला पाचशे रूपये देण्याचे ठरले होते. पण त्यालाही या आरोपी साहिलने चारशे रूपयेच दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पार्ट खरेदी करणारे, पार्ट वेगळे करणारे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा अशा पद्धतीचे काम करत असल्यामुळे त्याच्या पालकांनाही धक्का बसला आहे.