Solapur News : पतीनेच घात केला, पत्नीला जिवंत जाळलं; धक्कादायक घटनेने शहरात खळबळ

सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Solapur News : सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील लोकमान्य नगर परिसरात एका पतीने आपल्याच पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात विवाहित महिला गंभीररीत्या भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.


नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचं नाव फैजान जावेद शेख असून नर्गिस फैजान शेख असं पीडित महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नर्गिस आणि फैजान यांचा निकाह २०२४ मध्ये झाला होता. मात्र, संसाराची गाठ बांधल्यानंतर अवघ्या २ ते ३ महिन्यांतच त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागलं. दोघांमध्ये सतत खटके उडू लागल्याने ते एकमेकांपासून विभक्त राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात 'तलाक' देण्याच्या कारणावरून वारंवार वाद होत होते.

Advertisement

नक्की वाचा - Dhule News : लग्नापूर्वीच गर्भवती, पोटातील बाळ पाडण्यासाठी भयंकर केलं; तरुणीच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!


सासूला विश्वासात घेऊन रचला कट

१५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरी गेला. यावेळी त्याने आपल्या सासूचा विश्वास संपादन केला आणि मला नर्गिससोबत एकांतात बोलायचे आहे, असं सांगून तिला एका खोलीत नेलं. मात्र, फैजानच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होतं. नर्गिस खोलीत येताच फैजानने सोबत आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि लायटरने तिला पेटवून दिलं. नर्गिस आगीत होरपळत असतानाच आरोपी फैजानने तिथून पळ काढला.

घरातून नर्गिसच्या ओरडण्याचा आवाज आणि धूर निघत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. त्यांनी आग विझवून नर्गिसला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आरोपी फैजानवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

Topics mentioned in this article