राहुल कांबळे, प्रतिनिधी
नवी मुंबईतील (Navi Mumbai Crime) काही बार मालकांकडून जुन्या दारू साठ्याचा गैरवापर करून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही बार चालकांनी मागील महिन्यांत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा करून ठेवला होता. आता बाजारात दारूचे दर वाढल्याने, हे बार चालक जुना साठा बाहेर काढून तो नव्या वाढीव दराने ग्राहकांना विकत आहेत.
यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असून, हा प्रकार कृत्रिम भाववाढ व साठेबाजारी या स्वरूपाचा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची विक्री ही कायद्यानुसार निषिद्ध असूनही, संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत.
दरवाढीचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट
नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, घणसोली, कामोठे, उलवे, तुर्भे आदी भागांतील काही बारमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. सध्याच्या बाजारभावानुसार दारूच्या किंमती वाढलेल्या असल्या तरी, बार चालक जुन्या साठ्याची विक्री नवीन दराने करून अतिरिक्त नफा कमावत आहेत. परिणामी, सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे.
नक्की वाचा - Pune News : श्रावणापूर्वीचा शेवटचा रविवार, सकाळी 6 वाजेपासून दुकानांबाहेर मोठी गर्दी; Online बाजारात 1 किलो मटण 1200 पार
सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईची मागणी
या प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते, ग्राहक संघटना व स्थानिक रहिवासी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या असून, या व्यवहारांची चौकशी करून संबंधित बार चालकांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
कायद्यानुसार हा प्रकार गुन्ह्याच्या कक्षेत
साठेबाजारी व कृत्रिम भाववाढ करण्यास महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949 आणि उत्पादन शुल्क कायद्यानुसार सक्त मनाई आहे. मात्र, संबंधित यंत्रणांची उदासीनता आणि बार चालकांशी असलेली अनौपचारिक संगनमतामुळे असे प्रकार बिनधास्तपणे सुरू असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही
ग्राहकांची भूमिका आणि जनजागृतीची गरज
दर वाढीव वाटल्यास ग्राहकांनी तत्काळ बिल मागणे, विक्री रजिस्टर तपासणे व नजीकच्या उत्पादन शुल्क कार्यालयात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. यासोबतच, अशा बार मालकांविरोधात सोशल मिडियाच्या माध्यमातून जनमत तयार करून दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
तपास यंत्रणांचा कस लागणार
नवी मुंबईतील या वाढत्या साठेबाजारीच्या प्रकारामुळे तपास यंत्रणांचा कस लागणार आहे. ग्राहकांच्या खिशावर डल्ला टाकणाऱ्या बार चालकांविरोधात लवकरात लवकर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम व्यापक स्वरूपात शहरावर होतील, असा इशाराही सामाजिक क्षेत्रातून दिला जात आहे.