निलेश बंगाले, वर्धा
बायकोवर वाईट नजर ठेवणाऱ्या वडिलांना मुलानेच संपवल्याची घटना वर्ध्यातून समोर आली आहे. मुलासह कुटुंबाने केलेल्या तक्रारीवर पोलीस मागील दोन आठवड्यांपासून प्रकरणाचा तपास करत होते.15 दिवस गरगर फिरल्यानंतर पोलिसांना अखेर आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकारणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांना आरोपी मुलगा आणि त्याच्या मेव्हण्याला अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरसवाडा येथे वर्धा नदीच्या पात्राजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनीच हा खून असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांची तब्बल सहा पथके या खुनाच्या प्रकरणावर काम करत होती. अनेक बाजूंनी तपास करूनही काही सुगावा पोलिसांना लावत नव्हता. मात्र गाडीवरच्या एका बारीक डागामुळे बिंग फुटले आणि मुलानेच आपल्या मेव्हण्याच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे समोर आले.
(नक्की वाचा- डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक)
आधी गळा आवळला, मग कुऱ्हाडीने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नागोराव बाबाराव पारीसे (वय 34 वर्ष) याने मेव्हणा विलास केवदे (वय 28 वर्ष) याच्या मदतीने वडील बाबाराव पारिसे (वय 56 वर्ष) यांची हत्या केली. आरोपींनी आधी बाबाराव यांचा गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्रांने त्यांच्या गळ्यावर वार करुन कुऱ्हाडीच्या साहाय्याने डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात बाबाराव यांचा जागीच मृत्यू झाला.
नागोराव आणि कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत होते. मात्र पोलिसांना काहीच हाती लागत नव्हतं. अखेर खून करण्याकरता दोन्ही आरोपींनी जी मोटार सायकल वापरली होती त्यावरुन पोलिसांना एक धागा मिळाला. मोटार सायकलच्या डिक्कीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर गुन्ह्याची उकल झाली आणि मुलगा नागोरावच या हत्येमागे असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
(नक्की वाचा- डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव)
पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मृतक बाबाराव यांची सुनेवर वाईट नजर होती. याच बाप-लेकामध्ये नेहमी खटके उडत असत. ज्या दिवशी हत्येची घटना घडली त्या दिवशीही दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले होते. अखेर मुलाने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला.