मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai News : वसई पूर्वेच्या नायगाव परिसरातील एका सलूनमध्ये पाकिस्तानचा जयघोष करणारे गाणे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी सलून चालकाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
बुधवार, ३१ डिसेंबर रोजी नायगाव पोलीस गस्त घालत असताना चिंचोटी येथील ‘रुहान हेअर कटिंग सलून'मधून संशयास्पद गाण्याचा आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे यांनी सलूनमध्ये जाऊन पाहणी केली असता चालक अब्दुल रहमान शाह (वय २५) याने यूट्यूबवरील ‘काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे गाणे ब्लूटूथ स्पीकरवर लावल्याचं आढळून आलं.
पोलिसांची तत्काळ कारवाई
या गाण्यातून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. नायगाव पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १९७ (१) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी यूट्यूबवर गाणी ऐकत असताना संबंधित गाणे सुरू झाल्याचा दावा करण्यात आला असला तरीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. या प्रकाराची माहिती समोर येताच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.