माजी क्रिकेटपटूवर अवैध वाळू उत्खननाचा आरोप, रत्नागिरी तहसीलदारांनी बजावली नोटीस

या क्रिकेटपटूला 12 लाख 65 हजार रुपये का वसूल करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा करण्यात आली आहे, या नोटीसला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

मूळ कोकणातल्या असलेल्या माजी क्रिकेटपटूला रत्नागिरी तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळ असलेल्या रीळ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आलेले आहे. या बांधकामावरून दोन ठपके ठेवण्यात आलेले आहे. पहिला म्हणजे हे बांधकाम अनधिृकत आहे आणि दुसरा ठपका म्हणजे या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या वाळूचा बेकायदेशीर उपसा. या दोन्ही ठपक्यांसाठी ही नोटीस बजावण्यात आली असून त्यामध्ये या क्रिकेटपटूला 12 लाख 65 हजार रुपये का वसूल करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा करण्यात आली आहे, या नोटीसला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत

रत्नागिरी तहसीलदारांनी माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या प्रवीण आमरे यांना ही नोटीस बजावली आहे. आमरे यांचा काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 ऑगस्टला वाढदिवस झाला होता. आमरे हे मूळचे कोकणातले असून ते आता या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.

पदार्पणात शतक झळकावले

प्रवीण कल्याण आमरे यांचा जन्म 14 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता.   1991 ते 1999 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे आमरे यांनी प्रतिनिधित्व केले होते.  आमरे यांनी 11 कसोटी सामने आणि 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांनी आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न केला होता. 1992-1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे आमरे यांनी 103 धावांची खेळी खेळली होती. पदार्पणातच शतक झळकावणारा क्रिकेटपटू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. अशी कामगिरी करणारे ते नववे क्रिकेटपटू होते.

सचिनपेक्षा चांगला फलंदाज असेल, आचरेकरांचे उद्गार

1991 साली आमरे यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले होते.  इराणी चषक स्पर्धेत आमरे यांनी 246 धावा ठोकल्या होत्या. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आमरे यांनी आपल्या नावे केला होता. त्यांचा हा विक्रम,  2012 साली मुरली विजयने मोडला होता.  आमरे हे आतापर्यंत मुंबई, राजस्थान, बंगाल आणि रेल्वेच्या संघातून खेळले आहेत.  दक्षिण आफ्रिकेतील बोलंड संघातूनही ते खेळले आहेत.  रमाकांत आचरेकरांच्या हाताखाली त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले होते.  आचरेकर यांनी एकदा आमरे यांचे कौतुक करताना म्हटले होते की, प्रवीण आमरे हा  सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज असेल.

Advertisement