निनाद करमरकर, प्रतिनिधी
ठाण्यात एका डॉग केअर सेंटरमध्ये पाळीव श्वानांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत एका श्वानाला त्याचा डोळा कायमस्वरूपी गमावला असून दुसऱ्याला जबर मुका मार बसल्यामुळे तो मानसिक धक्क्यात आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात डॉग केअर सेंटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाण्यात राहणारे अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांच्याकडे व्हिस्की आणि डॉलर नावाचे दोन पाळीव श्वान आहेत. या दोघांना परदेशात जायचं असल्यामुळे त्यांनी 26 डिसेंबर रोजी त्यांच्या पाळीव श्वानांना येऊनमधील डॉग अँड पेट केअर सेंटरमध्ये काही दिवसांसाठी ठेवलं होतं. तिथे 27 डिसेंबर रोजी या दोन्ही श्वानांना कर्मचाऱ्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला.
त्यांनी तातडीने डोळा बाहेर आलेल्या डॉलर या श्वानाला रुग्णालयात दाखल करत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. ज्यात डॉलरचा एक डोळा काढावा लागला असून यामुळे आता डॉलर याला आयुष्यभरासाठी एका डोळ्याने अंधत्व आलं आहे. या सगळ्याची माहिती मिळताच अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांनी तातडीने भारतात धाव घेतली. यानंतर त्यांनी या डॉग केअर सेंटरकडे घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं असता त्यांनी सुरुवातीला फुटेज देण्यास टाळाटाळ केली. मात्र नंतर अभिषेक कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी तगादा लावल्याने जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं, ते पाहून अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
कारण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या दोन श्वानांसह इतरही श्वानांना डॉग केअर सेंटरचे कर्मचारी अमानुषपणे मारहाण करत असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या डॉग अँड पेट केअर सेंटर विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सध्या पोलीस पुढील तपास करत असून जी घटना आमच्या श्वानांसोबत घडली ती इतरांसोबत घडू नये, यासाठी या डॉग अँड पेट केअर सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी अभिषेक कुमार आणि बॉस्की पालन यांनी केली आहे.