Thane News: महाराष्ट्र पोलीस आणि सतर्क रेल्वे प्रवाशांमुळे मोठा गुन्हा उघडकीस आलाय. मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्टेशनवर तीन लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळण्यात आलाय. या प्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सोमवारी (1 डिसेंबर 2025) याबाबत माहिती दिलीय.
विठ्ठलवाडी स्टेशनवर नेमकं काय घडलं?
एका रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरजकुमार गुप्ता असे आरोपीचं नाव आहे. 29 नोव्हेंबर रोजी विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर मुलांना एकटे पाहून आरोपीने त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फसवून तेथून घेऊन जाण्याच्या तयारीत तो होता. मुलांची आई घरकाम करते आणि ती आपल्या दोन मुली-एका मुलाला (सर्व वयोमान 7-10 वर्षांदरम्यान आहे) काही वेळासाठी रेल्वे स्टेशनवर सोडून शांतीनगर परिसरात काम करणाऱ्या पतीला दुपारचे जेवण देण्यासाठी गेली होती.
प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला
पोलिसांनी सांगितलं की, मुलांच्या आसपास कोणी नसल्याची संधी साधून आरोपी गुप्ता मुलांजवळ गेला आणि त्यानं मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवलं. पण त्यांच्यातील एक मुलगी जोरजोरात रडू लागली. मुलीच्या रडण्याने स्टेशनवरील प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला हटकलं पण तो मुलांना स्वतःसोबत घेऊन जात होता आणि कथित स्वरुपात स्वतःच्याच म्हणण्यावर अडून बसला होता.
(नक्की वाचा: Vasai News: पुरुषांना रात्री लॉजवर न्यायच्या, दारूतून गुंगी देऊन दोघी भयंकर गोष्टी करायच्या; वसईत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश)
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुलांकडून प्रवाशांना समजली तेव्हा त्यांनी गुप्ताला चोप दिला आणि विठ्ठलवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.