योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Robbery Video : शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील सिंधी कॅम्प परिसरात पुन्हा एकदा चारचाकी वाहन चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली. घरासमोर उभी असलेली कार चोरट्यांनी काही मिनिटांतच लंपास केली.विशेष म्हणजे,चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी त्या गाडीची काच फोडली. त्यानंतर त्यांनी लॅपटॉपच्या सहाय्याने काही तांत्रिक प्रक्रियेचा वापर करत गाडी सुरू केली आणि क्षणातच घटनास्थळावरून पसार झाले.ही चोरी अत्यंत नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या आरोपींनी यापूर्वी एका शोरूममधून चारचाकी वाहन चोरी केले होते आणि त्याच वाहनाचा वापर करून ही दुसरी चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही टोळी सक्रिय असून शहरात वाहनचोरीचे जाळे वाढत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये पाऊल टाकताच अलर्ट राहा, एका आठवड्यात 2 जणांचा मृत्यू, नगरसेविकेची महापालिकेत धाव
पोलीस तपास सुरू, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
याप्रकरणी गाडीचे मालक नितीन नेभानी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयितांचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी,अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. तसेच वाहनधारकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. अतिरिक्त लॉकिंग सिस्टीमचा वापर करावा आणि सीसीटीव्हीची व्यवस्था ठेवावी,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.